Wednesday, 11 January 2017

रोजनिशी लिहिण्यास कारण की ...

रोजनिशी लिहिण्यास कारण की ...



खूप दिवसांपासून सातत्यपूर्ण लिखाण करण्याचा प्रयत्न होता परंतु या ना त्या कारणाने ते राहून जायचे. हे लिखाण न होण्याचे दुसरे कारण हे पण होते की आपण जे लिहायचे ते अचूक आणि मुद्देसूद असायला हवे हा  स्वतःकडून करत असलेला आग्रह. त्यात कुणाला चुका काढण्याची संधी द्यायला नको हा विचार देखील डोक्यात असे. पण यामुळे माझ्या लेखनावर मर्यादा यायला सुरुवात झाली. लिखाण शिकण्यासाठी व ते अचूक करण्यासाठी लिहीत राहणे हाच सर्वोत्तम उपाय असतो आणि तोच अवलंबणे यात राहून जात होते. म्हणून नवीन वर्षांपासून किमान दररोज होणाऱ्या घटना आणि अनुभव तरी ब्लॉगवर लिहिण्याचे ठरवले आहे. दररोजच्या नोंदी यासाठीही महत्वाच्या वाटतात की कामाच्या व्यापात अनेकदा विचारांना एक अर्थ आणि दिशा मिळत जाते, अनेक कल्पना मनात येऊन जातात व काळाच्या प्रवाहात त्या विस्मुतीत पण जातात पण हेच जर दैनंदिनपणे नोंद केले तर भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल असा विश्वास वाटतो. या लेखनाचा प्रमुख हेतू हा दररोज लेखन करत लिखाणात अचूकता मिळवणे हाच आहे . हे लिखाण फक्त माझ्या स्वतःच्या नोंदीणीसाठी असणार आहे .
आजपर्यंत बहुतांशी लेखन हे उत्स्फूर्त प्रश्न उत्तरे अथवा प्रतिक्रियेच्या स्वरूपातील सोशल मीडियावर होत. त्यातही जास्त प्रमाण व्हाट्सअँप ग्रुप्सवर असायचे. मी स्वतः सामाजिक प्रश्नोत्तरे या नावाने जे तीन ग्रुप्स स्थानिक, जिल्हा, व राज्यपातळीवरील बनवले होते त्यात चर्चेला दिशा देण्यासाठी व चर्चेत न येणारे मुद्दे मांडण्यासाठी सातत्याने लिहीत होतो. या लिखाणात सर्व बाजूंनी संतुलित आणि सर्वसमावेशक मांडणी होण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असे . परंतु त्या लिखाणाला खूपच मर्यादा होत्या. त्या मर्यादा लिहिण्याला आणि त्याच्या नोंदी करून ठेवण्याला देखील होत्या. काळानंतरने कामाच्या आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात हे लेखन देखील मागे पडले. यादरम्यान वाचनावर लक्ष केंद्रित करून मग वाचनावरच भर दिला. वाचन हा मनन, चिंतन आणि अभिव्यक्ती या प्रक्रियेनंतरच पूर्णत्वास जाते आणि हेच पूर्णत्व येण्यासाठीच हा माझा प्रयत्न ....